औरंगाबाद – शहरातील गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग असलेला आणि झोपडपट्टी दादा म्हणून कुख्यात पऱ्या उर्फ प्रवीण साबळेवर ऐन दिवाळीत संक्रांत आली आहे. पऱ्या साबळेवर मंगळवारी सायंकाळी 'एमपीडीए' कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. झोपडपट्टी दादा म्हणून कुख्यात पऱ्याची तत्काळ औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह हर्सूल येथे रवानगी करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरात आपल्या गुन्हेगारी करवायाने
आंबेडकरनगर येथील रहिवासी पऱ्या साबळेने पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. ३१ वर्षीय
या कुख्यात झोपडपट्टी दादावर लोकप्रतिनिधीवर जीवघेणा हल्ला यासह अनेक गुन्हे दाखल
आहेत. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशाने त्याच्यावर एमपीडीए
कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तांच्या या कारवाईने शहरातील
गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.
पऱ्या उर्फ प्रवीण साबळे या कुख्यात
गुन्हेगारावर यापूर्वी तडीपार आणि 'एमपीडीए' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.
मात्र त्याच्या गुन्हेगारी कृत्यात फरक पडलेला नव्हता. गंभीर स्वरुपाचे गुन्हे
त्याच्यावर दाखल आहेत. 'एमपीडीए' नुसार
त्याच्यावर दुसऱ्यांदा कारवाई केली जात आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या
आदेशाने त्याच्यावर कारवाई करुन त्याची रवानगी हर्सूल कारागृहात
करण्यात आली आहे.












